पुणे जिल्हा : वाहनांवरील थकीत दंड सवलतीत

बारामतीत लोकअदालत मोहीम उद्यापासून
बारामती/ जळोची –
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत आपल्या दंडाची रक्कम भरता येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि. ८ ते १३ एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती वाहतूक शाखा नवीन इमारतीत ही लोकअदालत होणार आहे.

थकीत रकमेच्या ५० टक्के रकमेवर सवलत मिळाल्याने नागरिकांची धावपळ थांबणार आहे. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. सहा दिवसांसाठी ‘हेल्प डेस्क’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ही सुविधा बारामती येथे सुरु करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर पुणे येथील न्यायाधीश एस.एच. वानखडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,

बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस आमदार सर्जेराव बागल यांनी विशेष प्रयत्न केले.

गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सुट्टीचे वार वगळता ही मोहीम सुरु राहणार असून दंड वसुलीचे कामकाज वाढले तर अधिकचे दिवस ही मोहीम सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.