पुणे जिल्हा : पावसाळ्यातच तोंडचे पाणी पळाले

पाणीटंचाईचे सावट : कोंढापुरीच्या तलावात खडखडाट
रांजणगाव गणपती –
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील तळ्यातील पाण्याने तळ गाठल्यामुळे रांजणगाव गणपती, शिक्रापूर येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या तळ्यावर अवलंबून असलेल्या शेतक-यांना ही धडपड करावी लागणार आहे.

सध्या चासकमान कालव्याची आवर्तने बंद झाली आहेत.शेतकरी वर्ग चातका प्रमाणे पावसाची वाहत आहे. मात्र, अपेक्षेनुसार पावसाचे आगमन ही होत नाही. पुणे शहरात ज्या प्रमाणात पाऊस होत आहे. तशा स्वरुपाचा पाऊस ही अद्याप होत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतक-यांना व नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या कोंढापुरी येथील मल्हार तळ्यामध्ये केवळ तीन ते चार दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना दमदार पाऊसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रांजणगाव व शिक्रापुरच्या पाणीपुरवठा योजनांबरोबरच या तळ्यातून लवकरच अनेक गावे जलजीवन योजनेद्वारे पाणी उपसा करणार आहे. परिसरातील पिंपरी दुमाला, खंडाळे, गणेगाव खालसा, वाघाळे, वरुडे, कोंढापुरी, निमगाव म्हाळूंगी गावातील शेतीसाठी ही तळ्यातील पाण्याचा उपसा होत असतो. मात्र, सध्या तळ्यातच पाणी अत्यल्प असल्यामुळे हे पाणी संपल्यावर आता पुढे काय, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.