पुणे जिल्हा : पूर्व मोसमी पाऊस बरसला

दौंड तालुक्यातील शेतकरी समाधानी

मलठण – दौंड तालुक्यात मागील तीन चार दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत उकाड्याने असह्य होत असेल तरी नंतर दमदार पावसाने वातवणात गारवा निर्माण केला आहे. दौंड तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

नैऋत्य मान्सून अद्याप दाखल जरी झाला नसला तरी वळीवाच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात दिलासा दिला आहे. आकाशात ढगांची दाटी येऊन हळुवार वाऱ्याची झुळूक आणि विजांच्या कडकडाटासह मेघराजा बरसत आहे.

मागील वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी व उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने धरणाच्या फुगवट्यातील गावांना भीमा नदी कोरडी पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला.

शेतीच्या पाण्यासाठी विहीर, बोअरवेल यांचा पर्याय काढून कशीबशी पिके जगवण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे वातावरणातील बदलाबरोबर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळ्या, मेंढ्या, पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न आता तरी मार्गी लागला आहे.