पुणे जिल्हा: ऑनलाइन लाइक, रिव्ह्यू देण्याच्या बहाण्याने 18 लाखांना गंडा

वाघोली -वाघोलीतील आयव्ही इस्टेट परिसरात राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीला टेलिग्राम अ‍ॅपवर मेसेज करून हॉटेलला लाइक व रिव्ह्यू देण्याच्या ऑनलाइन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सुमारे 18 लाख 42 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय फिर्यादीच्या टेलिग्राम अ‍ॅप वर वर्क फ्रॉम होम जॉबबाबत मेसेज करून ऑनलाइन हॉटेलला लाइक व रिव्ह्यू देण्याचे टास्कद्वारे पैसे कमविण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला 27 हजार रुपये जमा केल्यानंतर 48 हजार रुपये टास्कचा परतावा मिळाला. फिर्यादीचा विश्वास बसल्याने वेळोवेळी 18 लाख 90 हजार रुपये ऑनलाइन विविध टास्कद्वारे भरण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतरही परतावा मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फिर्यादीने सायबर पोलिसात तक्रारी अर्ज दिल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.