पुणे जिल्हा : अवकाळीच्या धास्तीने शेतकरी हवालदिल

भोर तालुक्यातील मशागतीची कामे रेंगाळली
भोर –
भोर तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून दिवसाआड ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतीची खरिपाच्या पिकाची मशागतीची कामे रखडली आहेत.

तर, आवकाळी पावासाने आनेक ठिकाणी, झाडे तसेच घराच्या भिंती कोसळण्याचे प्रकार झाले असल्याने हा उन्हाळा आहे की पावसाळा तेच कळेनासे झाले आहे. तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण दररोज सायंकाळी तयार होत असून दिवसाआड अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह धोधो कोसळत आहे.

शेतकरी हवालदिल
सध्या उन्हाळा संपत आल्याने शेतकरी खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामांसाठी आतुर झाला असला तरी रोजच आवकाळी पावसामुळे हातबल झाले आहेत. शेतीची मशागत होऊन पाऊस झाला तर तो पिकांसाठी उपयुक्त ठरतो. तालुक्यात रस्त्यावर, शेतात झाड कोसळणे तसेच वीज कोसळण्याचे दोन तीन प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

हिरवा चारा डोकाऊ लागला…
पंधरा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत असल्याने माळरानांवर तसेच शेताच्या बांधांना चांगलाच हिरवा चाऱ्र्याने फुटवा झाला असून जनावरांना उन्हाळ्यातही काहीशा प्रमाणात हिरवा चाऱ्याची चव चाखता येणार आहे. तर, पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असुन उकाडाही घटला असल्याचे महुडे खोर्यातले प्रगतशिल शेतकरी जगन्नाथ गोळेयांनी सांगितले.