पुणे जिल्हा : निर्भय, सक्षम महिला देशाच्या विकासाची दिशा ठरवितात

सुधीर पाडुळे ः इंदापूर महाविद्यालयात निर्भय कन्या उपक्रमांतर्गत कार्यशाळा
इंदापूर –
मुलांनी महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. मुलींनी आपल्या स्वसंरक्षणासाठी आरोग्य जपले पाहिजे तसेच आपल्या समस्या आपल्या आई-वडिलांबरोबरच शिक्षक वर्गाचे चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. निर्भय व सक्षम महिला देशाच्या विकासाची दिशा ठरवितात, असे प्रतिपिादन इंदापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुधीर पाडुळे यांनी केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान या उपक्रमांतर्गत कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर पाडुळे तसेच इंदापूर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. माधुरी चंदनशिवे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, कला शाखाप्रमुख डॉ. भीमाजी भोर, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर उपस्थित होते.

मुलींचे आरोग्य समस्या व उपाय या विषयावर बोलताना डॉ. माधुरी चंदनशिवे यांनी विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहिती सखोल व सविस्तर पद्धतीने पटवून सांगितली. योग्य आहार व व्यायाम करून आपले आरोग्य उत्तम ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी मुलींनी आपल्या आई-वडिलांबरोबर मैत्रीपूर्व संबंधातून आपल्याला निर्माण होणार्‍या समस्यांचे निराकरण करावे असे सांगितले तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षकांपर प्रति आदरभाव जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आपल्या वर्तनाला नैतिक अधिष्ठान असल्यास समस्या निर्माण होत नाहीत.

क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी योग व्यायाम व खेळाचे महत्व विद्यार्थिनींना समजून सांगितले ते म्हणाले की, योग्य आहार व व्यायाम मुळे व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. तानाजी कसबे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रज्ञा लामतुरे यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. विद्या गायकवाड यांनी मानले यावेळी विविध विभागाच्या प्रमुख व निर्भय समितीतील सर्व सदस्य व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.