पुणे जिल्हा : खुनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी अटकेत

लोणी काळभोर – पैसे घेतलेल्या मित्राची माहिती न दिल्याने एका नायजेरियन व्यक्तीला 8 ते 10 नायजेरियन नागरिकांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) येथे एक वर्षापूर्वी घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी तब्बल एक वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी पिसोळी (ता. हवेली) येथून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

संडे विलियम्स उर्फ ऍडमिन संडे औनवे (वय 39, सध्या रा. पिसोळी; मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वी या गुन्ह्यातील थॉमसन रोथीनी सोथोमेवा (वय 25) आणि फेडरिक उर्फ फेड इव्होव्ह (वय. 35, दोघेही रा. हांडेवाडी ता. हवेली) या दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी मायकेल ओकेलु चुकवुमेका (वय 38 रा. हांडेवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील 4 ते 5 साथीदार फरार आहेत. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस हवालदार केतन धेंडे, सोमनाथ गळकोट यांनी कोंढवा पोलिसांच्या मदतीने केली आहे.