पुणे जिल्हा : सेन्सर गॉगलची गडकरींनी घेतली दखल

नवी दिल्लीत अवसरीतील आयुषने घेतली भेट
मंचर –
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील न्यू ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनलच्या इयता आठवीच्या विद्यार्थ्याने रस्ते अपघात टाळण्यासाठी बनविलेल्या सेन्सर गॉगलची दखल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घेऊन विद्यार्थ्याचे कौतुक केले.

महामार्ग आणि इतर रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. अपघातांच्या विविध कारणांमध्ये चलकाला डुलकी लागून महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी अवसरी खुर्द येथील न्यू ऑक्‍सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधील आयुष घोलप या शेतकरी कुटुंबातील मुलाने तयार केलेल्या सेन्सर गॉगलची मदत होऊ शकते.

एक शेतकरी कुटुंबातील मुलाच्या प्रयत्नांना प्रोत्साहित करण्याचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक विभाग करू शकतो, या संकल्पनेतून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी शाळेच्या संस्थापिका स्वाती मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेतली.

यावेळी आयुषचे वडील अमोल घोलप व इतर शिक्षक मंडळी उपस्थित होते. मंत्री नितीन गडकरी यांनी आयुष घोलप या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यासाठी तातडीने त्याला भेटवस्तू देऊन प्रोत्साहित केले व त्याला इतर सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली. मंत्री गडकरी यांच्याशी संवाद घडवून आणल्याबद्दल दिलीप मेदगे यांचे विशेष आभार मानण्यात आले.

काही सूचना केल्या

आयुषने तयार केलेल्या सेन्सर गॉगलची किमिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समजून घेऊन यामध्ये काही सूचना केल्या. तसेच हा गॉगल कमी दरामध्ये चालकांसाठी उपलब्ध करण्यासाठीची मदत व यातील काही तांत्रिक बाबी मदत, त्याच्या पेटंटसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.