पुणे जिल्हा: जुगारातील वाद जीवावर बेतला; रांजणगावात एकाच खून

रांजणगाव गणपती – येथे जुगार खेळताना झालेल्या पैशाच्या वादातून सहकाऱ्याने एकाचा खून केला. ही घटना (दि.13) रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. गजानन शंकर सोनाग्रे (वय 35. रा. रांजणगाव, लांडेवस्ती, मूळ रा. नांदूर), असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रमोद मुद्रीका पांडे (वय 42, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. किर्तीसिंगपूर, उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये श्रीकृष्ण रामचंद्र बावस्कर (रा. शिक्रापूर, कळमकरवस्ती,मूळ रा. पानेराखेडी, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव हद्दीतील हॉटेल राजयोगसमोरील नगर-पुणे महामार्गालगतच्या मोकळ्या शेतामध्ये फिर्यादी व त्याचे मित्र गजानन शंकर सोनग्रे, राम शनेश्वर माने व आरोपी प्रमोद मुद्रिका पांडे असे चौघेजण पैशांवर पत्ते खेळत होते.

त्यानंतर फिर्यादी व राम माने घरी निघून गेल्यानंतर गजानन सोनग्रे व प्रमोद पांडे असे दोघेच पत्ते खेळत होते. त्यांच्यामध्ये पत्ते खेळण्यावरुन वाद झाला. या कारणावरुन आरोपी प्रमोद पांडे याने गजानन सोनग्रे याच्यावर ठिकठिकाणी तसेच डोक्‍यात दगडाने मारुन गंभीर जखमी केले. दगडाचा घाव वर्मी बसल्याने यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.