पुणे जिल्हा : सोने-चांदीला झळाळी; खरेदीदारांना झटका!

ऐन लग्नसराईत भावात वाढ झाल्याने बजेट बिघडले
नारायणगाव –
सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

सद्यस्थितीत सोने प्रति 10 ग्रॅम 64 हजार 120 तर चांदी प्रति किलो 80 हजार 500 वर पोहोचली आहे. सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आठवड्यात सोन्यात 2437 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीतही 3300 रुपयांनी दर वाढला. रविवारी (दि. 3) सोन्याचे दर 63726 रुपयांवर होते तर चांदी प्रति किलो 80500 रुपये होती.

अशातच सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने प्रति 10 ग्रॅम 394 रुपयांनी तर चांदी स्थिर आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा पेट्रोल-डीझेलसह धातूंवर देखील झालेला पाहायला मिळाला आहे. सोने 63 हजारांवर गेले असून जीएसटीसह 64 हजाराच्या वर आहे. विशेष म्हणजे सोने यंदा मे महिन्यात 62 हजारांच्या पार गेले होते. पुन्हा एकदा लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. चांदीने प्रथमच प्रति किलो 80 हजारांचा आकडा पार केला आहे. याचा परिणाम लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबांवर दिसून येत आहे.

 लग्नसराईवर महागाईची छाया
तुळशी विवाह संपताच लग्नसोहळे सुरु झाले आहेत. अशा स्थितीत लोकांना महागड्या किमतीत दागिने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. महागाईची छाया लग्नसराईवर दिसत आहे. लग्नसराईचा हंगाम पाहता येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

लग्नसराई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता आलेली असल्याने सोन्या-चांदीची मागणी वाढलेली आहे. तसेच लग्नसराईत सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असतानाच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. पुढील काही दिवसात सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सोने 65 हजाराच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.
– प्रथमेश अनिल जवळेकर, मॅनेजिंग डायरेक्टर, श्री प्रथमेश ज्वेलर्स प्रा.लि.