पुणे जिल्हा | ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

पुणे – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 5 जून रोजी मतदान तर 6 जून रोजी मतमोजणी होणार असून, तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस येत्या 5 मे 2022 प्रसिद्ध करावी, असा सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण 222 ग्रामपंचायतीमधील एकूण 243 रिक्त जागेची पोट निवडणूक होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

दरम्यान, या निवडणुक प्रक्रियेमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 13 मे ते 20 मे या कालावधीत सादर करायचे आहे. त्यामध्ये दि. 14, 15 आणि 16 मे ची सार्वजनिक सुटी वगळून अन्य दिवसात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देश सादर करता येणार आहे. दि. 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाणनी होईल.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 25 मे रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान 5 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. तर मतमोजणी 6 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्‍चित करतील.