पुणे जिल्हा : इंदापूर, बारामतीत मुसळधार पावसाची बॅटिंग

शेत, रस्ते, ओढे-नाले ओव्हरफ्लो : बळीराजा सुखावला
भवानीनगर –
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, बेलवाडी, त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील काटेवाडी, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, खताळपट्टा, ढेकळवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी संपूर्ण आभाळ एकवटल्याने मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री सलग सहा ते सात तास जोराचा पाऊस पडल्याने वातावरणातील बदलामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पुन्हा वातावरणात बदल होऊन वातावरणातील तापमान वाढल्याने नागरिकांना उन्हाचा चटका बसू लागल्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु शनिवारी (दि. 8) दुपारी आकाशामध्ये ढग जमा होऊन दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पावसाने सुरुवात केली.

सायंकाळी सात वाजले तरी देखील मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने शेतामध्ये त्याचप्रमाणे सर्व रस्त्यांवर ओढ्या नाल्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने खर्‍या अर्थाने यावर्षीच्या पावसाळ्यास सुरुवात झाली असे म्हणावे लागेल.

उन्हामुळे शेतातील पिके देखील जळू लागली होती. यावेळी सात जून पासून पावसाने मुसळधारपणे पडण्यास सुरुवात केल्याने शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.