पुणे जिल्हा : भाटघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

भाटघर – गेल्या दोन दिवसांपासून भाटघर परिसरात थोडाफार पाऊस झाला. तर शनिवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजता मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. यादरम्यान ओढ्या नाल्यातून तसेच रस्त्याच्या शेजारून वेगाने पाण्याचा प्रवाह वाहू लागला. तर काही ठिकाणी शेत जमिनी पाण्याने तुडुंब भरल्या.

शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होऊन एक तासाभराने जोरदार पावसास सुरुवात झाली. यावेळी कामावरून घरी परतणाऱ्या दुचाकी स्वरांना आडोशाचा आसरा घ्यावा लागला. तर महावितरणची वीज खंडित झाल्याने महिलांना घरातील स्वयंपाकांसाठी विजेची वाट पाहावी लागली.

मान्सून पावसास सुरुवात झाल्याने हवामानात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली. शेतकरी वर्गाने बी बियाणे खरेदी केली असून पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्यास खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होतील.

गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उन्हाळ्यामध्ये भाटघर धरणातील पाणीसाठा लवकरच कमी झाला होता. यामुळे नागरिकांवर जल संकट उभे राहिले होते. परंतु मान्सून पावसाने वेळीच हजेरी लावल्याने भाटघरवासियांना दिलासा मिळाला.