पुणे जिल्हा : मिक्सरमधून रस्त्यावर खडी पडल्याने अपघातांत वाढ

पोलिसांकडून कारवाई व्हावी ः मुळशीकरांची मागणी
पौड –
मुळशी तालुक्यात मुख्य रस्त्यावरून सिमेंट काँक्रीट (आरसीएम) ट्रकची (मिक्सर) वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या मिक्सरमधून रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी पडत असल्याने यावरून दुचाकी घसरून अपघातांत वाढ झालेली आहे.

मुळशी तालुक्यात सध्या नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बांधकामांनी वेग घेतला आहे. पूर्वी बांधकाम करताना स्लॅब बांधताना जागेवरच वाळू, सिमेंट एकत्र करून बांधले जायचे; मात्र आधुनिकीकरणच्या जमान्यात यंत्राला मोठी मागणी आहे. मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रिट) प्लॅन्ट उभे करण्यात आलेले असून, मागणी येईल त्या भागात मिक्सरची गाडी माल घेऊन जात असते.

या मिक्सरच्या गाड्याची मागणी ही बांधकामासह काँक्रीटीकरणच्या रस्त्यासाठी उपयोग करण्यात येतो. भूगाव, चांदे किंवा इतर ठिकाणाहून तालुक्यात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मागणीनुसार मिक्सरच्या गाड्या जातात. या गाड्यांमधून सिमेंट, वाळू आणि खडी एकञ केलेला माल रस्त्यावर अनेक ठिकाणी पडतो. या पडलेल्या मालामुळे काही ठिकाणी ढिग तयार होतात तर काही ठिकाणी ही खडी विखुरली जाते. विखुरलेल्या खडीमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडून जखमी होत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पहाटे एक मिक्सर घोटावडे फाटाहून पौड मार्गे कोळवण भागात गेला. या सर्व मार्गावर सलग ठिकाणी जास्त खडी पडली होती. चाले ते पौड दरम्यान या खडीवरून दोन दुचाकी चालक पडून जखमी झाले. यामुळे या सिमेंट काँक्रीटीकरण करणार्‍या वाहनावर वाहतूक योग्य होत नसल्यास कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

पिरंगुट घाटात खडीचा थर
पिरंगुट घाटात मध्यवर्ती ठिकाणी अवघड वळणावर या मिक्सरच्या गाड्या थांबतात. झटके देत देत या गाड्या वर जातात. यामुळे या वळणावर दररोज खडी पडून पडून येथे खडीचा थरच साचला आहे. याठिकाणी अनेक दुचाकीचालक घसरून पडलेले आहेत.

 पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा
मिक्सरची वाहतूक करणारे ट्रक ठराविकच जणांचे आहेत. या पडलेल्या खडीमुळे दुचाकी चालकांचे वाहन चालविणे अवघड झाले आहे. तरी अशा धोकादायक आणि खडी पाडणाय्रा मिक्सरवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी दुचाकी चालक करीत आहेत.