पुणे जिल्हा : वाघोली, लोणीकंद, भावडी येथील प्रदूषणजन्य प्रकल्पांची तपासणी सुरू

वाघोली – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या तालुक्यांमध्ये वाढत असलेल्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) रेडी मिक्स डांबर, क्राँक्रिट प्लांट, खडी मशीन आणि वाळू पॉलिशिंग प्रकल्पांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील प्रकल्पांच्या पाहणीनंतर सध्या वाघोली, भावडी, लोणीकंद भागांतील प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू झाले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कायद्यानुसार खडी मशिन, रेडीमिक्स प्रकल्पांना गावाच्या हद्दीजवळ काम करण्यास परवानगी नाही; मात्र गेल्या काही वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विस्तार झाल्याने या प्रकल्पांजवळ आता वसाहती उभ्या राहिल्या आहेत. परिणामी, तेथील नागरिकांना प्रकल्पांमधून उडणार्‍या धुळीचा त्रास होत आहे. या धर्तीवर ‘एमपीसीबी’च्या अधिकार्‍यांनी गेल्या काही दिवसांत 35हून अधिक कारखान्यांना भेट देऊन तेथील कामकामाजाची पाहणी केली.

मावळ तालुक्यात आम्ही 35 हून अधिक कारखान्यांची पाहणी केली. हे सर्वेक्षण आठवडाभर चालते, आमचे पथक वेगवेगळ्या वेळांमध्ये तेथील हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेते. वार्‍याच्या वेगानुसार तेथील अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) किती दूरवर जाऊ शकतात, याचा अंदाज वर्तवला जातो. धूलिकण रोखण्यासाठी कारखान्यांकडून नियमांची अंमलबजावणी होते आहे का, याच्याही नोंदी घेतल्या जातात. या सर्वेक्षणात मंडळाच्या परवान्याशिवाय कार्यरत आढळलेल्या प्रकल्पांना आम्ही बंदची नोटीस दिली जाते.

खडी मशिन प्रकल्पांवर जल प्रदूषण आणि नियंत्रण अधिनियम, वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यानुसार आम्ही कारवाई केली जाते. उन्हाळ्यात वार्‍याबरोबर धूलिकण दूरवर जातात, त्यामुळे खडी मशिन, डांबर मिक्सर प्रकल्पांनी या काळात सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारखान्यांच्या आवारात स्प्रिंकलर्स बसविणे आणि कायद्यानुसार सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांत मावळ, वाघोली, लोणीकंद भागांतील नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या आधारे आम्ही पहिल्या टप्प्यात ‘पीएमआरडीए’ भागातील या कारखान्यांची पाहणी आणि कारवाई मोहीम हाती घेतली आहे. विनापरवाना कार्यरत सात प्रकल्पांना बंदची नोटीस दिली असून, काहींवर कारवाई केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत खडीमशिन, वाळू पॉलिशिंग आणि डांबर मिक्सरचे प्रकल्प आहेत. मात्र, सर्वाधिक दीडशे प्रकल्प पुणे (पीएमआरडीए) हद्दीत कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वायू प्रदूषणाचा विषय गंभीर झाला असून, या प्रकल्पांच्या आवारात राहणार्‍या नागरिकांकडून आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आम्ही सध्या या कारखान्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
-व्ही. व्ही. किल्लेदार, ‘एमपीसीबी’ उपप्रादेशिक अधिकारी पुणे