पुणे जिल्हा : छत्रपतीच्या निवडणुकीत जिजामाता पॅनल ताकदीने लढणार

पॅनलचे सर्वेसर्वा काळे यांची घोषणा : शरद पवार गटाने तयारी दाखविल्यास तयारी

भवानीनगर : इंदापूर तालुक्यामध्ये अग्रगण्य मानला जाणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिजामाता पॅनल पूर्णपणे ताकदीनिशी लढणार आहे. हा पॅनल आम आदमी एकत्र येऊन तयार होणार आहे. आतापर्यंत कारखान्यावर असलेल्या घराणेशाहीच्या पगडा असलेल्यांच्या विरोधात लढणार आहे. घोषणा जिजामाता पॅनलचे सर्वेसर्वा सुनील काळे यांनी केली.

कारखान्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांनी आम्हाला सोबत घेऊन श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाचे निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली तर नक्कीच आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्याबरोबर श्री छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. बारामती येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुनील काळे म्हणाले की, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1991 साली ताब्यात घेतला. त्या वेळेपासून आजपर्यंत हा साखर कारखाना प्रगतीपथावर असून सध्या हा कारखाना या भागामध्ये एक नंबरचा साखर कारखाना असल्याचे गणले जात आहे. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा 1992 साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात आला. त्यावेळेपासून आतापर्यंत गेल्या 32 वर्षांमध्ये कारखान्याची प्रगती न होता हा सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आजपर्यंत कायमस्वरूपी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. दोन्ही कारखान्यांवर सत्ता अजित पवार यांचीच असून देखील हा फरक नक्की कशामुळे होत आहे, याचा विचार जनतेने केला पाहिजे.

ते म्हणाले की, 1992 साली सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता पॅनल हा तयार करण्यात आला. त्यावेळी 1997 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुनील काळे यांच्यावर श्री छत्रपती कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातल्याने त्यांचे व त्यांच्या दोन भावांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी त्याच सभेमध्ये तातडीने ठराव मांडून तो ठराव मंजूर करण्यात आला. परंतु याबाबत सर्व माहिती घेऊन सर्वसाधारण सभेमध्ये घडलेल्या घटनेबाबत कोणतीही बाब प्रलंबित नसल्याने 15 मे 2024 रोजीच्या ॲड. प्रतिमा विजय पवार यांनी काढलेल्या नोटीसमध्ये सुनील काळे व त्यांचे दोन्ही भाऊ श्री छत्रपती कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद होते. आजही आहेत. याबाबतचे पत्र श्री छत्रपती साखर कारखान्यास व तत्कालीन अध्यक्षांना दिल्याची माहिती काळे यांनी दिली.

सर्व बाबींचा विचार करून लढणार
काळे म्हणाले की, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सर्व बाबींचा विचार करून जिजामाता पॅनल हा पूर्ण ताकदीनिशी उभा राहील. सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर हा पॅनल उभा राहणार असून खऱ्या अर्थाने आम आदमीचा हा पॅनल असणार आहे.

सुनील काळे म्हणाले की, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये जिजामाता पॅनल हा आम आदमीला घेऊन लढणार आहे. मात्र, श्री छत्रपती कारखान्याच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांनी आम्हाला सोबत घेऊन श्री छत्रपती कारखान्याची संचालक मंडळाचे निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली तर नक्कीच आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्याबरोबर श्री छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तयार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.