पुणे जिल्हा : कस्तुरी चव्हाणने पटकावले सुवर्णपदक

नारायणगाव : येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालयातील कस्तुरी संदीप चव्हाण विद्यार्थीनीला लखनऊ (उत्तरप्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या 67 व्या शालेय राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाखालील गटामध्ये 4 बाय 100 मीटर रिले क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.

कस्तुरीने विक्रमी वेळेत प्रथम क्रमांकाने स्पर्धा पूर्ण केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक आणि क्रीडा शिक्षक बबन गुळवे यांनी दिली.

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत तिला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. यापूर्वी तिने चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. तिने मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, उपाध्यक्ष सुजित खैरे,

कार्यवाह रवींद्र पारगावकर, मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, उपमुख्याध्यापक सतीश तंवर, पर्यवेक्षक विलास शिंदे, सुषमा वाळिंबे यांनी अभिनंदन केले. कस्तुरीस क्रीडा शिक्षक बबन गुळवे, राहुल नवले, कावजी भवारी, बाबासाहेब वळकुंदे, साहेबराव गाळव यांनी मार्गदर्शन केले.