पुणे जिल्हा : भांडगावच्या सरपंचपदी लक्ष्मण काटकर

समर्थकांकडून फटाक्‍याची आतषबाजी, गुलालाची उधळण
यवत –
दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथील सरपंचपदी लक्ष्मण काटकर यांची सोमवार (दि.16) बिनविरोध निवड केली. काटकर यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी व ग्रामस्थांनी फटाक्‍याची आतषबाजी करीत गुलालाची उधळत करीत जल्लोष केला.

सरपंच संतोष दोरगे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी कुल गटाचे ज्येष्ठ लक्ष्मण काटकर यांची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंड तहसील कचेरीमधील अव्वल कारकून अजित मोहिते, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, गावाकामगार तलाठी पुंडलिक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड जाहीर केली.

यावेळी माजी सरपंच संतोष दोरगे, उपसरपंच तुषार शेंडगे, सदस्य युवा कार्यकर्ते अमित दोरगे, विकास सोसायटीचे चेअरमन बिरा पिंगळे, विजय शेंडगे, संदीप भानुदास दोरगे, राहुल खळदकर उपस्थित होते. दोन्हीही गट एकत्र करून काटकर यांना सरपंच करण्यात पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे सहकार्य लागले. गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्‍वासाला पात्र राहून विकासासाठी सदैव प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया काटकर यांनी दिली आहे.

भांडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात गटाचे कार्यकर्ते यांनी गट तट विसरून ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण काटकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भांडगाव गावाने या पाठीमागील निवडणूक काळात संघर्ष पाहिला आहे. पण हा संघर्ष गावाविकासात अडथळा ठरवू नये यासाठी नवीन पायंडा, एक आदर्श उदाहरण म्हणून तालुक्‍याला भांडगाव गावच्या माध्यमातून घालून दिला आहे. दोन्हीही गट एकत्र येत गावचा विकास करीत असल्याने आनंद असून येणाऱ्या काळातील निवडणुका देखील बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– नितीन दोरगे, माजी उपसभापती, पंचायत समिती, दौंड.