पुणे जिल्हा : जातेगाव खुर्दच्या सरपंचपदी मासळकर बिनविरोध

शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निवडीत सरपंचपदी मोनिका गणेश मासळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जातेगाव खुर्द येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आळणे व ग्रामविकास अधिकारी छाया साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी मावळत्या सरपंच नंदा रणपिसे, उपसरपंच अतिश निकाळजे,

ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर, विकास मासळकर, वैशाली मासळकर, अश्विनी खंडाळे, मोनिका मासळकर, सुभाष खंडाळे, पूनम कशिद उपस्थित होते. दरम्यान, मोनिका मासळकर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले. मात्र, त्यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज न आल्याने मोनिका मासळकर यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आळणे व ग्रामविकास अधिकारी छाया साकोरे यांनी जाहीर केले.

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच मासळकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक गणेश मासळकर, प्रवीण मासळकर, समीर खंडाळे, गणेश तांबे, शहाजी मासळकर, योगेश मासळकर उपस्थित होते. दरम्यान, निवडीनंतर बोलताना गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावचा विकास करत गाव आदर्श करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच मासळकर यांनी जाहीर केले.