पुणे जिल्हा : राजगुरूनगरतील ‘कोंडी’ आमदार मोहितेंनी फोडली

पंचायत समिती चौक जॅम : अर्ध्या तासाने वाहतूक सुरळीत
राजगुरूनगर –
शहरातील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. शनिवारी (दि. 3) शहरात सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीत आमदार दिलीप मोहिते पाटील अडकले त्यांनी सुरक्षारक्षकासह रस्त्यावर उतरवून रस्त्यावरची कोंडी सोडविण्यास सुरुवात केली.

शहरातून जाणाऱ्या शिरूर-राजगुरूनगर- वाडा -भीमाशंकर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे; मात्र या महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत आहेत. नागरपरिषद व पोलीस यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. तर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे.

शहरात पंचायत समिती चौकात शनिवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली, येथील इंग्लिश मेडियमची शाळा सुटल्याने व कंपनी बसेस, शाळेच्या बसेस इतर जड अवजड वाहने, एसटी बसेस आणि दुचाकीची गर्दी झाल्याने चारही बाजूने रस्ते जॅम झाले. याचवेळी आमदार मोहिते पाटील हे एका कार्यक्रमाला खेडमध्ये येत होते.

वाहतूक कोंडी झाल्याने व येथे पोलीस यंत्रणा नसल्याने त्यांनी स्वतः गाडीतून खाली उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षक, स्वीय सहायक सतीश कदम, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे आदी कार्यकर्त्यांनी अर्धा रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवली. राजगुरूनगर शहरात रोज वाहतूक कोंडी होत आहे मात्र पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांचे अशम्य दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांची मागणी
* शाळा सुटण्याच्या वेळेस व कंपनी बसेस येण्या जाण्याच्या वेळेस पोलीस थांबवावा
* शहरातील रस्त्याच्या कडेने झालेली मोठी अतिक्रमणे हटविण्यात यावीत
* शहरातील मोठ्या दुकानापुढे होणारी पार्किंग हटविण्यात यावी
* पथारीधारकांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमणे हटवावीत