पुणे जिल्हा : राजगुरूनगरात समस्यांचा डोंगर; रस्त्यांची बिकट अवस्था

उपाययोजना करण्यात नगरपरिषदेला अपयश

राजगुरूनगर – शहरातील विविध प्रश्‍न सोडवण्यात यावेत व नगरपरिषदेत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. राजगुरूनगरमध्ये रस्ता, पाणी व कचरा समस्या वाढल्या आहेत. वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. दिवसागणिक शहरातील नागरिकांच्या समस्या वाढत आहेत नगरपरिषदेच्या माध्यमातून उपाय योजना केल्या जात नाहीत. राजगुरूनगर शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. या समस्या तात्काळ व प्राधान्याने सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

राजगुरूनगर शहरातील समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन खेड तालुका भाजपच्यावतीने मुख्याधिकारी निवेदिता घार्गे याना देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, दीप्ती कुलकर्णी, शहर अध्यक्ष बाळासाहेब कहाणे, नगरसेवक मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, अमोल सांडभोर, शुभम भन्साळी, दत्तात्रय सांडभोर, संदीप दिवटे, धीरज आदक, रुपेश खांगटे, नितेश पवार, रोहन तनपुरे, सी. एन. दीक्षित यांच्यासह राजगुरूनगरमधील नागरिक उपस्थित होते.

खेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने डेंग्यूसदृश आजारावर मात करण्यासाठी धुर फवारणी करावी.नागरिकांना घर मिळकतीचे उतारे वेळेत मिळावेत, साठेनगर मधील नागरिकांना कचऱ्याच्या समस्येचा त्रास दूर करावा, शहरामध्ये मोठया प्रमाणावर कामगार वर्ग आहे त्यांना रविवारी सुट्टी असते त्यामुळे रविवारी घंटागाडी सुरु करून कचरा गोळा करावा, शहरातील सार्वजनिक ठिकाणी साठलेला कचरा उचलण्यात यावा, शहरातील रस्ते दुरुस्ती व मजबूत करण्यात यावेत, रस्त्यातील खड्डे तात्काळ भरावेत, शहरात होत असलेल्या रस्त्यांची कामे प्रशाकीय मान्यतेने होत नाहीत. मजूर रस्ता दुसरीकडेच केला जात आहे.

भाजपकडून आंदोलनाचा इशारा

रस्ता, पाणी आणि आरोग्याचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवावेत. तसेच नगरपरिषदेत प्रशासनाचा मनमानी कारभार चालल्यामुळे नागरिकांचा अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी नागरिकांना त्याचा त्रास होवू नये म्हणून तत्परतेने कामे मार्गी लावावीत अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.