पुणे जिल्हा : यात्रा-जत्रांना आचारसंहितेची बाधा

मंनोरजनाच्या कार्यक्रमांवर वेळेची बंधने : यात्रा कमिटीसमोर अनेक प्रश्‍न निर्माण
जुन्नर –
जुन्नर तालुक्यातील विविध गावांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम गुढीपाडव्या पासून सुरू झालेला असून अक्षय तृतीवापर्यंत हा हंगाम सुरू राहणार आहे. वर्षातून एकदा होणार्‍या गाव देवांच्या यात्रा जत्रांच्या हंगामावर यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे काही बंधने आलेली असून या यात्रांमधील रात्रीच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमावर वेळेचे बंधने आलेली आहेत. यामुळे यात्रा कमिटींसमोर अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत.

गावोगावच्या यात्रा जत्रांमध्ये देवदेवतांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याबाबतचे नियोजन आधीच केलेले असते.परंतु यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने काही बंधने यात्रा नियोजनावर आली आहेत.

रात्रीच्या कार्यक्रमांना वेळेचं बंधन निश्‍चित करण्यात आलेले असून रात्री 10 वाजेपर्यंतच मनोरंजनाच्या कार्यक्रमाला प्रशासनाकडून परवानगी मिळत आहे. आता रात्री10 वाजेपर्यंतच हे कार्यक्रम कसे काय पार पाडायचे हा प्रश्न यात्रा कमिटींसमोर उभा राहिलेला आहे. शासकीय अधिकारी शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेचे तसेच नियमांचे पालन करत आहेत. हे नियम न पाळणार्‍यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई होत आहे.

जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा दि. 9 ते दि. 11 मे या कालावधीत साजरी होणार असून याबाबतच्या नियोजनाकरिता यात्रा कमिटी पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनासमवेत बैठक आयोजित केली होती. या तीन दिवसांमध्ये मनोरंजनाचे महागडे तीन कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आले आहे.

नियोजन बैठकीमध्ये या कार्यक्रमांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हे सर्व कार्यक्रम कसे काय पार पाडायचे हा प्रश्न यात्रा कमिटी समोर उभा राहिला असल्याचे शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष विनायक गोसावी, चंद्रशेखर जोशी, शाम खोत, सखाराम घोटकर, राजेंद्र टण्णू, रुपेश जगताप, ओंकार जोशी, रज्जाक इनामदार यांनी स्पष्ट केले.