पुणे जिल्हा : चांडोली येथे ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

– मंचर पोलिसांनी घेतले ट्रकचालकाला ताब्यात
मंचर –
चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गाव कारभारी प्रभाकर काशिनाथ थोरात यांचे कळंब (ता.आंबेगाव) येथे रविवार, दि. ९ रोजी दुपारी पायी चालत असताना अपघाती निधन झाले. अपघात करणाऱ्या ट्रकचालकाला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चांडोली बुद्रुक वेताळ मळ्यातील प्रभाकर काशिनाथ थोरात हे कळंब येथील हॉटेल इंद्रसमोर चांडोली बुद्रुक गावाच्या हद्दीतील वेताळमळा येथे घरी पायी जात असताना पुणे नाशिक हम रस्त्यावर पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 14 ईएम 65 86 या मालट्रकने त्यांना समोर धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालक संतोष देवराम कणसे (वय ४९, रा. राजुरी) यांना ताब्यात घेऊन मंचर पोलिसांच्या हवाली केले आहेत.

मंचर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा ट्रक चालकावर दाखल केल्याचे सांगण्यात आले. प्रभाकर थोरात यांचा चांडोली बुद्रुक गावच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी गावात समजतात सर्वांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रभाकर थोरात यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले ,एक मुलगी असा परिवार आहे.

अपघाताच्या घटनेबाबत सांगताना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप थोरात आणि शिवसेना युवा सेनेचे जिल्हा अधिकारी प्रवीण थोरात पाटील यांनी सांगितले की, पुणे नाशिक हम रस्त्यावर एकलहरे हॉटेल इंद्रसमोर गतिरोधक आहे. परंतु काही प्रमाणात गतिरोधक खराब झाले आहे आणि डिव्हायडर एका बाजूने आहे. दुसऱ्या बाजूने नाही. त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या गाड्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरात अपघात होत आहे. हम रस्ता प्रशासनाने त्वरित डिव्हायडर आणि गतिरोधक उभारावेत अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे, लागेल असा इशारा दिला.