2500 पैकी 700 हेक्‍टर सोयाबीन करपले

जुन्नरच्या पूर्व भागातील स्थिती : पीक काढणीस सुरुवात
राजुरी –
जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागामध्ये सोयाबीन पीक काढण्याच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, या भागामध्ये यंदा पावसाने ओढ दिल्याने 2500 हेक्‍टरपैकी 700 हेक्‍टर पीक पूर्णपणे जळून गेलेले असल्याने यंदा शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे.

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागातील आळे, वडगाव आनंद, राजुरी, बेल्हे, नळावणे, आणे, शिंदेवाडी आदी गावांमध्ये सोयाबीन काढण्याची कामे सुरू झाली झाली आहेत. जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक शेतकरी घेत आहेत. पण यावर्षी पर्जन्यमान वेळेत न झाल्यामुळे सोयाबीन पिके काही प्रमाणात जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

उत्पादनामध्ये यावर्षी 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे तसेच काही शेतकऱ्यांची सोयाबीनचे पिके पूर्णपणे काळात जळून गेली आहे. त्या शेतकऱ्यांना पूर्ण केलेला खर्चही 100 टक्‍के तोटा सहन करावा लागणार आहे तर त्यामुळे सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न फार कमी झाले आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघू शकत नसल्याचे वास्तव आहे.

या पीकाला एकरी 15 ते 20 हजार खर्च येतो सोयाबीन उत्पन्न एकरी 10 क्विंटलपर्यंत होते पण वेळेत पाऊस न झाल्यामुळे या उत्पन्नात घट आली आहे, त्यामुळे सध्या चार क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते. सोयाबीन पीक फुलोऱ्यात व शेंगा फुगण्याच्या कालावधीत पावसाने ओढ दिल्यामुळे हा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
– वैभव विश्‍वे, मंडल कृषी अधिकारी, बेल्हे

यावर्षी नियमित पाऊस झाला नाही ऐन फुलोऱ्याच्या काळात सोयाबीन पिकाला पावसाचा झटका बसला त्यामुळे फुलगळ झाली. सोयाबीनच्या शेंगांची फुगवण झाली नाही. दरम्यान, सोयाबीन पिकाला केलेला खर्च भागत नाही त्यामुळे आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
– अरुण औटी, शेतकरी, राजुरी