पुणे जिल्हा : पालकांनी मुलांबाबत दक्ष असणे गरजेचे – अजित पवार

बारामतीत पोषक आहार अभियान सुरू
बारामती –
आजची मुले हे देशाचे भविष्य आहेत.त्यामुळे ही पिढी सदृढ आणि सशक्‍त असणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांबाबत यासाठी दक्ष असणे आवश्‍यक आहे. बारामतीत पोषक आहार अभियान सुरू होत असल्याचे मनापासून समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथे नटराज नाट्य कला मंदिर, श्री सद्‌गुरु विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री विश्‍ववती आयुर्वेदिक चिकीत्सालय व रीसर्च सेंटर यांच्या संयुक्‍त विद्यमाने मुलांसाठी मोदामृत अभियानाची पवार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी उपननगराध्यक्ष बिरजु मांढरे, सुधीर पानसरे, डॉ.सौरभ मुथा आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने कुपोषण मुक्तीसाठी राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आखला आहे.आरोग्य आणि शिक्षणाला महत्त्व देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकार विविध कार्यक्रम आखत आहे.

कुपोषणाच्या विळख्यातून सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. पोषक आहाराच्या कमतरतेने वेगवेगळे आजार होतात. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. शरीराची झीज भरुन काढणे, कार्यशक्ती वाढण्यासाठी अन्नाची गरज आहे. असे त्यांनी नमूद केले.

संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लहान मुलांची आरोग्य तपासणी, पोषक पदार्थांचे बिस्कीट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी जयंती,लालबहादुर शास्त्री जयंती दिनी बारामतीत देखील असा प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली आहे.
– किरण गुजर, प्रमुख, नटराज नाट्य कला मंदिर, बारामती