पुणे जिल्हा : पाण्यासाठी पाबळमध्ये एकजुटीचे दर्शन

पाबळ : शिरूरच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या 14 गावांसाठी एकमताने ग्रामसभेचे ठराव घेण्यात आले. पाबळ येथील ठराव प्रचंड प्रतिसादात व हात वर करून करण्यात आला. यावेळी पाणी पाणी आणि पाणी यासाठीच काम करणार अशी भूमिका एकमताने घेण्यात आली. तर केंदूर ग्रामपंचायतीने मोठ्या जल्लोषात ग्रामसभेत ठराव करून भूमिका स्पष्ट करून आंदोलनाला उस्फूर्त पाठिंबा व्यक्त केला.

पाबळची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामस्थ, सर्व पक्षाचे पदाधिकारी महिला वर्ग, ग्रामपंचायत सदस्य यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियोजित व काटेकोरपणे अंमलबजावणी करून विविध गावांच्या सदस्यांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना आंदोलनाची व्याप्ती समजावून सांगत एक एक पाऊल सावधपणे टाकत असल्याची बाब समितीच्या माध्यमातून पुढे आली असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. यावेळी सरपंच सचिन वाबळे, माजी सरपंच सोपान जाधव, परमेश्‍वर चौधरी, अर्जुन गायगवारे, नामदेव पानसरे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पाणी आंदोलनाला पूरक असे 25000 सह्यांची उद्दिष्ट मोहीम राबवून पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या गोळा करण्याचे काम माजी सरपंच मारुती शेळके यांच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती सरपंच वाबळे यांनी दिली.

नजरेत भरणारे ठराव
ग्रामसभेत मतदानावर बहिष्कार, चासकमान नाही फक्‍त व फक्‍त डिंभ्याचे पाणी, 14 गावे दुष्काळग्रस्त शिरूर तालुका पाणी हक्‍क संघर्ष समितीला पाठिंबा व यासाठी राजकिय नेत्यांपासून दूर राहणे यासारखे ठराव करण्यात आले.