पुणे जिल्हा : चिंचोलीत पवार कुटुंब एकत्र येणार

अनंतराव पवार स्कूलच्या नूतन वास्तूचे रविवारी उद्‌घाटन
बारामती –
विद्या प्रतिष्ठानच्या भिगवणजवळील चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन रविवार (दि. 22) होत आहे. खासदार शरद पवार यांच्या हस्ते हे उद्‌घाटन होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अध्यक्षस्थानी असतील. खासदार सुप्रिया सुळे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. पक्ष फुटीनंतर हे तिन्ही नेते या कार्यक्रमानिमित्ताने प्रथमच एकत्र येणार असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपद पटकावले. दोन पवारांमधील ही लढाई सध्या निवडणूक आयोग व न्यायालयात गेली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या आयोग व न्यायालयीन लढाईचे नेतृत्व करीत आहेत. पक्ष फुटीनंतर बारामतीत दाखल झालेल्या अजित पवार यांचे जंगी स्वागत झाले होते. पक्ष फुटल्यापासून हे तिन्ही नेते एकत्र आलेले नाहीत. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवार व अजित पवार हे एका व्यासपीठावर होते. परंतु त्यांनी एकमेकांना टाळले.

या पार्श्‍वभूमीवर विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या एका इमारतीच्या उद्‌घाटनानिमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र येत आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेचे शरद पवार अध्यक्ष आहेत. पण दर आठवड्याला बारामतीत येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहातच आपला जनता दरबार घेत आहेत. भिगवणजवळील या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे तिघे एकत्र येतील का, की उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला जाणे टाळतील, याकडे आता लक्ष लागले आहे.