पुणे जिल्हा : पौडच्या सरपंचपदी प्रमोद शेलार बिनविरोध

पौड : पौड (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रमोद सुभाष शेलार यांची बिनविरोध निवड झाली. अजय कडू यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी शेलार यांची निवड झाली. तथापि निवडीनंतर शेलार यांनी मंत्रिमंडळात होणाऱ्या शपधविधीप्रमाणे गोपनियतेची शपथ घेत आपल्या कामकाजाला सुरूवात केली. सरपंचाने शपथविधी घेण्याची ही तालुक्‍यातील पहिलीच घटना आहे.

या निवडीत माजी सरपंच कडू, उपसरपंच प्रिती आगनेन, रसिका जोशी, मोनाली ढोरे, नंदाताई नवले, प्रशांत वाल्हेकर, प्रकाश शिंदे, वंदना भोईने यांनी सहभाग घेतला होता. सरपंचपदासाठी शेलार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी गुलफाम शेख, तलाठी मेजर पालवे यांनी शेलार यांच्या निवडीची घोषणा केली.

समन्वयक संकेत दळवी, ऍड. सचिन सदावर्ते, ऍड. सागर ढोरे, माजी उपसरपंच किरणकुमार आगनेन यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तिळवण तेली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शेलार यांनी पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी गोपनीयतेची शपथ घेतली. ग्रामविकास अधिकारी विनोद दुधाळ यांनी त्यांना शपथ दिली.

यावेळी गंगाराम मातेरे, विनायक ठोंबरे, किरण दगडे, जनाताई इप्ते, गोरख दगडे, दशरथ मानकर, दीपक करंजावणे, कैलास मारणे, इलाक्षी महाले, आप्पा चोंधे, किरण दगडे, वैभव मिरकुटे, पोलीस पाटील संजय पिंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष रितेश ढोरे, ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब रायरीकर, राहुल तलाठी, चंदूदादा केणी आदि उपस्थित होते. शेलार यांच्या शपथविधी उपक्रमाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले. सदस्यांना विश्‍वासात घेऊन गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.