पुणे जिल्हा : निवृत्त सैनिक भालेराव यांची काढली गावातून मिरवणूक

सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल केला नागरी सत्कार
मंचर – कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी वस्तीवरील सैनिक सचिन शांताराम भालेराव यांनी भारतीय सैन्य दलात शिपाई ते हवालदार या पदापर्यंत २४ वर्षे अविरत सेवा बजावली. शेतकरी कुटुंबातील सैनिक सचिन यांनी जिद्दीच्या जोरावर कष्ट करून भारतीय सैन्य दलात प्रामाणिक काम करून नाव मिळवले. आपला सैन्यदलातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची कळंब गावातून मित्र परिवाराने वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला.

सचिन भालेराव त्यांनी सैन्य दलातील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर कळंब या मूळ गावी परत आल्यानंतर समस्त ग्रामस्थ कळंब, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि फौजी मित्रांनी एकत्रित येत आकर्षक फुलांनी गाडी सजवून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेशवाडी वस्ती ते कळंब गावापर्यंत चौकातून फुलांची उधळण करत मिरवणूक काढली. मळगंगा देवस्थान ट्रस्ट प्रांगणात सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला. महादू भालेराव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा सचिन कानडे होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,दिवगंत वडील शांताराम भालेराव यांच्या प्रतिमेचे पूजन फौजी सचिन भालेराव, त्यांची पत्नी शुभांगी भालेराव, आई लता भालेराव तसेच मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या प्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव, माजी सरपंच शरद भालेराव, माजी चेअरमन शिवाजी भालेराव, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे,ज्योती येवले, महेंद्र पारधी, माजी सैनिक भिकाजी भालेराव, देविदास भालेराव, सुहास फलटणे, माजी विस्तार अधिकारी शांताराम थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सेवानिवृत्त फौजी सचिन भालेराव यांना शुभेच्छा देतेवेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. आर.भालेराव, सोसायटी संचालक संजय भालेराव,सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील भालेराव, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव, शिक्षक बाळासाहेब कानडे, रघुनाथ पोंदे,संतोष इंदोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक विकास कानडे यांनी सूत्रसंचालन केले. त्यांचे बंधू असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर संदीप शांताराम भालेराव यांनी आभार मानले.

विविध प्रांतात सेवा बजावली…
सचिन भालेराव यांनी बेळगाव, सिकंदराबाद, पूंच जम्मू काश्मीर, पंजाब, पठाणकोट, अरुणाचल प्रदेश, अहमदाबाद, राजस्थान, कोटा डेहरादून,नौशेरा अशा विविध प्रांतामध्ये सेवा बजावली.