पुणे जिल्हा : दौंडमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांविरोधात निषेध मोर्चा

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

दौंड – दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे ज्येष्ठ नागरिकांशी, विविध पक्षांच्या, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धटपणे वागतात. या निषेधार्थ दौंडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.

आंदोलनात माजी नगराध्यक्ष शितल कटारिया, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी( कवाडे गट), ऑल इंडिया पॅंथर सेना, भीम वॉरियर्स संघटना, दौंड मर्चंट व व्यापारी महासंघ, नागरिक हित संरक्षण मंडळ आदींचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी (दि.5) रोजी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान गोल राऊंड परिसरामध्ये ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्याशी अव्यवहार्य वर्तन केले. त्याचा निषेध करण्यात आला.

त्यांच्याविरुद्ध अनेक व्यक्ती, पक्ष ,संघटना यांनी आंदोलने करून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविलेला आहे. त्यांचे निलंबन करण्यात यावे, त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास (दि.13) रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.