पुणे जिल्हा : प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रांताधिकाऱ्यांची भेट

कापूरहोळ : नसरापूर (ता. भोर) येथील पंतसचिवकालीन वाड्यात शासकीय विविध कार्यालये असून, वाडा मोडकळीस आल्याने तेथील कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागातील छत कोसळले होते. याबाबत दै. “प्रभात’ने बातमी प्रसिद्ध केली होती, त्याची दखल घेत सोमवारी (दि. 3) भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी नसरापूर येथील पंतसचिव कालीन जीर्ण वाड्याची आणि आरोग्य केंद्रातील पडलेल्या छताची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता विकास कुलकर्णी, शाखा अभियंता इक्‍बाल शेख उपस्थित होते.

प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, अंगणवाडी, पोलीस स्टेशन, तसेच बंद अवस्थेत असलेल्या वाड्याच्या भागाची पाहणी केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मोडकळीस आलेला वाडा, भिंतीना चिरा, तडे, गळती, वाड्यातील लोकांची वर्दळ कचरे यांना दाखविली. जीर्ण वाडा धोकादायक असल्याचे प्राथमिक अंदाज बांधकाम विभागाच्या
अधिकाऱ्यांनी वर्तविले.

भाडोत्री तत्त्वावर आरोग्य केंद्र आणि महसूल कार्यालयाच्या कामकाजासाठी नसरापूर येथील बाजार समितीच्या आवारातील गाळ्यांची पाहणी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी केली. यावेळी सरपंच सपना झोरे, उपसरपंच संदीप कदम, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, सदस्य इरफान मुलाणी, गणेश दळवी, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, मंडलाधिकारी प्रदीप जावळे उपस्थित होते. वाड्याची संपूर्ण पाहणी अहवाल व पंचनामा करून तातडीने निर्लेखन प्रस्ताव करण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच बहुउद्देशीय इमारत होण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचना देखील दिल्या.

अंगणवाडीसह महत्त्वाची कार्यालये हलवणार
प्रांताधिकारी कचरे यांनी अंगणवाडीचे दोन दिवसात स्थलांतर होईपर्यंत मुलांना सुटी जाहीर केली. वरच्या मजल्यावरील मंडलाधिकारी आणि तलाठी कार्यालय येत्या सात दिवसांत, तर इतर कार्यालये एक महिनीच्या आत स्थलांतराचा निर्णय देण्यात आला आहे.