पुणे जिल्हा : पुरंदर उपसा सिंचन योजना बंद

पंपगृहाच्या देखभाल दुरुस्तीचे काम दीड महिने चालणार
लाभार्थी गावांना पाण्याची 42 दिवस वाट पाहावी लागणार
3 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत काम चालणार
बेलसर –
पुरंदरची जीवन वाहिनी समजल्या जाणार्‍या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह क्रमांक एक ते सहा व त्यावरील स्थापत्य विद्युत व अभियांत्रिकी त्यावरील घटकांचे देखभाल व दुरुस्तीच्या अनुषंगाने अत्यावश्यक कामे करणे करिता पंप पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार येणार आहे. त्यामुळे आता लाभार्थि गावांना जवळपास दीड महिना या योजनेच्या पाण्याची वाट पहावी लागणार आहे. 3 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पंपगृह एक ते सहा पूर्णपणे बंद ठेवणार असून या मुदतीमध्ये कोणतेही सिंचन आवर्तनाकरिता लाभक्षेत्रात पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग पुण्याचे कार्यकारी अभियंता म. भी. कानिटकर यांनी प्रसिद्धि पत्रकामध्ये नमूद केले आहे.

पुरंदर उपसा सिंचन योजनेवर जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्र तर पुरंदर तालुक्यातील जवळपास 42 तर बारामतीमधील 16 गावे ही ओलिताखाली येतात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या भरवशावर या लाभधारक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून देखील चारा पिके व भाजीपाला पिके लागवड केली गेली आहेत; परंतु आता जवळपास दीड महिना पंप हाऊस बंद राहणार असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

दुष्काळाता देखभाल दुरुस्ती का?
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात पंप हाऊसची दुरुस्ती व देखभाल करण्याची मागणी करत होते ती आता पूर्ण झाली आहे; परंतु योजना सुरू झाल्या पासून अनेक वर्षांनी दुष्काळात ही देखभाल दुरुस्ती का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीसाठी जेव्हा पाण्याची अत्यंत गरज आहे अशावेळी पंप बंद करून दुरुस्ती केली जात आहे. तर पुरंदर उपसा सिंचन योजनेची देखभाल दुरुस्ती योजना चालू झाल्यापासून म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर केली जाणार आहे.

या सर्व देखभाल दुरुस्तीचा खर्च शासनाकडून मेकॅनिकल डिव्हिजन यांच्यातर्फे केला जाणार आहे विशेष दुरुस्ती प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे त्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू होईल उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत चालण्यासाठी आता ही देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. तर सर्वांशी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
– महेश कानिटकर, कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग

पुरंदर तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने पाण्याची खुप कमी उपलब्धता आहे.आणि त्यातच टंचाईच्या व शेतीला पाणी गरजेचे असताना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पंप बंद ठेवण्यात येणार असल्याने शेतीवर मोठे संकट येणार आहे. पुरंदर उपसा योजनेच्या भरवशावर बळीराजांनी शेतातील पिके व जनावरांना चारा पिके लावली आहेत आता त्याचे काय होणार हा मोठा प्रश्‍न समोर उभा आहे.
– चंद्रकांत हिंगणे, उपसरपंच, बेलसर