पुणे जिल्हा : बारामतीत पक्षबांधणीसाठी डागडुजी

नणंद-भावजय यांच्या लढतीवर चर्चा : शरद पवार गट ऍक्‍टिव्ह मोडवर
प्रमोद ठोंबरे
बारामती –
राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करीत भाजपची घरोबा केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या महिन्यापासून शरद पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी नियुक्‍तीमधून संघटन मजबूत करीत बांधणी सुरू आहे.

राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपतील मातब्बरांनी यश मिळवले आहे. बारामती मतदारसंघ जिंकण्याचे स्वप्न भाजपा उराशी बाळगून आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या बारामती मतदारसंघात यंदा चमत्कार घडविण्याचे भाजपचे मनसुबे स्पष्ट आहेत. ही जागा अजित पवार गटाला देऊन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात सुळे यांच्या विरोधात उतरवून शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशीच निवडणूक होणार, या चर्चेने सध्या जोर धरला आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपाबरोबर सत्तेत जाऊन अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. मात्र, शरद पवार गटाने बालेकिल्ल्यात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ एस. एन. जगताप यांची निवड केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दूर होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. मात्र, अजित पवार गटाचा उमेदवार दिला तर राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला भेदने अशक्‍य नाही. असे चित्र निर्माण केले जात आहे.

पार्थ पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी देखील भेटीगाठींवर भर दिला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने केंद्रीय पातळीवर तयारी केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन व केंद्रातील अन्य मंत्र्यांची बारामती लोकसभाचे दौरे झाले. राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. अजित पवार हे भाजपात गेल्यानंतर मात्र या मंत्र्यांचे दौरे कमी झाले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुळे यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार रिंगणात राहिला आहे.

नणंद-भावजय आमने-सामने?
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 2024 च्या लोकसभेसाठी बारामती मतदारसंघाचे चित्र वेगळे असेल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. 2014 साली रासपाचे महादेव जानकर तर 2019 साली भाजपच्या कांचन कुल या सुळे यांचे विरोधात लढल्या. 2024 मध्ये सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार, अशी लढतीची शक्‍यता आहे. त्यामुळे नणंद- भावजय यांच्यातील लढतीचे आणि संभाव्य उमेदवारीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ तापले आहे.

कुटुंबातून उमेदवारी मिळाल्यास….
बारामती विधानसभा मतदारसंघातूनच राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवारास मोठ्या प्रमाणात लीड मिळते. अजित पवार यांचे प्रभूत्व असल्याने लोकसभेचा उमेदवार अजित पवार गटाचा असल्यास बारामतीतून सुळे यांचे लीड कमी होईल, या मानसिकतेतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.