पुणे जिल्हा: बैलगाड्यांनी रोखला सरडेवाडी टोल नाका

इंदापूर बाह्यवळण सेवा रस्ता बांधून देण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
रेडा (प्रतिनिधी)-
इंदापूर शहरालगतच्या पुणे-सोलापूर बाह्यवळण येथील बेडशिंग रस्ता ते पायल सर्कलपर्यंतच्या महामार्गालगत सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) करण्याच्या मागणीसाठी इंदापूर शेतकरी कृती समितीच्या वतीने सरडेवाडी टोल नाक्‍यावर बैलगाड्यांनी टोल नाका बंद करण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालकांना इंदापूरचे नगरसेवक पोपट शिंदे आणि शेकडो शेतकऱ्यांनी सह्या करून सात वर्षांत अनेकवेळा निवेदन दिले. खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे दोन वेळा पत्र जोडून राजमार्ग प्राधिकरणास पाठपुरावा केला तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने इंदापूर शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहनाचे निवेदन देत सोमवारी (दि. 21) सरडेवाडी टोल नाक्‍यावर टोल बंद पाडला.

आंदोलनात शेतकरी महिला, लहान मुले, अनेक शेतकरी कुटुंब व तरुण सहभागी झाले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेकडो पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी टोल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलनाचे प्रमुख नगरसेवक पोपट शिंदे यांच्याशी तहसीलदार अनिल ठोंबरे, प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलकांनी स्पष्ट विरोध केला. त्यानंतर तहसीलदार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चिटणीस यांना इंदापूर तहसील कार्यालयात आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

राज्यमंत्री भरणेंच्या मध्यस्थीने आंदोलनाला यश
शेतकरी आंदोलन करणार आहेत याचे निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पोहोचताच भरणे यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला आणि पुणे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून आदेश दिल्याने, शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी राजमार्ग प्राधिकरणाचे संचालक यांनी धाव घेतली आणि राज्यमंत्री भरणे यांच्या मध्यस्थीने काम सात तासांत झाले.