पुणे जिल्हा : लोणीच्या सरपंचपदी सावळेराम नाईक

लोणी धामणी : लोणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी सावळेराम आबाजी नाईक हे 1 हजार 287 मते मिळवून विजयी झाले. पराभूत हेमंत पडवळ यांना 484 आणि विजय आदक यांना 36 मते पडली.

सदस्य पदाच्या नऊ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर सर्वसाधारण महिलेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आदिका खोमणे आणि स्वाती वाळूंज निवडून आल्या. बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे – राजेंद्र वाळुंज, प्रकाश गायकवाड, राहुल आढाव, वैशाली उदागे, पुष्पा रोकडे, प्रदीप कोचर, मंगल गायकवाड हे आहेत.

माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदस्यपदाच्या सात जागा बिनविरोध झाल्या; परंतु सरपंच पद व सदस्य पदाच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. सावळेराम नाईक व नवनिर्वाचित सदस्यांची गावातून मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच उद्धव लंके, माजी सरपंच दिलीप वाळुंज, उद्योजक राजू थोरात, पिंटू पडवळ, चंद्रकांत गायकवाड, बाळशिराम वाळुंज व राष्ट्रप्रेमी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.