पुणे जिल्हा : ग्राहकांना महावितरणकडून “शॉक’

ऐन सणासुदीत वीजदरवाढीला जावे लागणार सामोरे
पुणे –
वीज खरेदी खर्चात वाढ झाल्याने आता विजबिलांत इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना प्रति युनिट 35 पैसे जादा द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांना वीजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

याबाबतचे आदेश महावितरणच्या मुख्य अभियंतांनी (वीज खरेदी) काढले आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरू राहणार आहे. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील, तसेच पाचशे युनिटपेक्षा अधिक वीज वापरकर्त्यांवरही परिणाम होणार आहे. या सोबतच कृषी वीजजोडणी असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट दहा व पंधरा पैसे, तर औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट 20 पैसे जादा द्यावे लागणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

मागील वर्षी अडीच रुपये वाढ
दरम्यान, देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. परिणामी वीज वितरण कंपन्यांना खुल्या बाजारातून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. त्यामुळे गतवर्षी जून ते ऑक्‍टोबर या पाच महिन्यांच्या बिलात प्रति युनिटमागे कमीत कमी 25 पैशांपासून जास्तीत जास्त अडीच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती, असेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.