पुणे जिल्हा : आंबेगावच्या आदिवासी भागात शेती मशागतीला वेग

डिंभे – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या पावसाळयापूर्वीच्या शेतीच्या मशागतीच्या कामांसोबतच घरे शेकारणीच्या कामांनीही वेग घेतला असून भिमाशंकर, आहुपे, पाटण, कोंढवळ या भागात ही कामे उरकण्यासाठी लगभग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार अतिवृष्टी पावसासाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरांची कौले बदलून नवीन कौले टाकली जातात. घराच्या भोवताली एका विशिष्ट प्रकारच्या झुडपापासून मिळणाऱ्या झावळयांनी घरे शेकारली जातात.

यामुळे अतिपाऊस व जोरदार वाऱ्यापासून घराच्या भीतींचे संरक्षण होते. घरे शेकारणीमुळे पावसाळयाचे चार महिने कितीही पाऊस झाला तरी घराची ऊब कायम राहते. कोकण व घाटमाथ्यावरील अतिपावसाच्या भागात घरांचा आकार चौमवळी स्वरूपाचा असतो. सतत दिवसरात्र जोरात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी जलदगतीने खाली उतरण्यासाठी या प्रकारची घरे बांधली जातात.

तसेच पावसाळयाची चाहूल लागल्याने भात पिकाच्या पेरणीबरोबरच पावसाळयापूर्वीची इतर कामे आटोपण्यात या भागातील शेतकरी मग्न आहे. आहुपे, पाटण, भिमाशंकर, कोंढवळ या भागातील व वाडयावस्त्यांवरील बहुतेक शेतकऱ्यांनी भात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.