पुणे जिल्हा : हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली सुरू करा

देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांची मागणी
वाघोली –
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वाघोलीतील वाघेश्वर मंदिरामध्ये स्मशानभूमीत जवळपास 70 लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मात्र हे काम पूर्ण झालेले नाही, असा आरोप वाघोलीतील स्थानिक नागरिकांनी करत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारी व काम करणारे कॉन्ट्रॅक्टर यांनी हे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी वाघोलीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

वाघोली येथील वाघेश्वर मंदिर परिसरात असणार्‍या स्मशानभूमी सुधारण्यासाठी पुणे मनपाच्या वतीने रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, प्रदूषण मुक्त स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात होते; मात्र काही कारणामुळे हे काम अंतिम टप्प्यात येऊन थांबले असल्याने तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.

वाघोली गावाची लोकसंख्या जवळपास 3 लाखाच्या आसपास पोहचली आहे. वाघेश्वर मंदिर परिसरात असणार्‍या जुन्या स्मशानभूमीच्या ठिकाणी ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने वेळोवेळी ग्रामनिधीचे माध्यमातून कामकाज करण्यात आले होते. वाघोली हे गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर वाघोलीसाठी प्रदूषणमुक्त अशी स्मशानभूमी उभी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली होती.

वाघोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी होणार्‍या वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी ही प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी.
-राजेंद्र सातव पाटील, अध्यक्ष वाघेश्वर देवस्थान वाघोली