पुणे जिल्हा: खेडमध्ये रिंगरोडवरून विरोधकांची स्टंटबाजी

राजगुरूनगर – रिंगरोड बाधित 12 गावांतील शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळवून देण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गेली सहा वर्षांपासून प्रयत्न केले. आताही वाढीव मोबदला मिळवा यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र विरोधक पत्रकार परिषद घेत शेतकर्‍यांची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे.

केवळ स्टंटबाजी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा घणाघात जिल्हा दूध संघाचे संचालक तथा माजी जिप सदस्य अरुण चांभारे यांनी घातला आहे. पुणे चक्राकार मार्ग (रिंगरोड) वरून खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 12 गावांतील बाधित शेतकरी व त्याच्या प्रतिनिधीनी 2 वेळा पत्रकार परिषद घेतल्या. त्यात आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

खेड पंचायत समितीच्या पुढे 12 गावांतील बाधित शेतकर्‍यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी बाधित शेतकरी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने वातावरण तापले होते. त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपाला उत्तर देण्यासाठी खेड बाजार समितीच्या कार्यालयात राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी चांभारे बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, संचालक पप्पू टोपे, अशोक राक्षे, वसंत भसे, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, राजगुरुनगर वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅॅड. संजय गोपाळे, अ‍ॅड. अरुण मुळूक, अ‍ॅड. सुखदेव पानसरे यांच्यासह सह रिंगरोड बाधित शेतकरी उपस्थित होते.

अरुण चांभारे म्हणाले की, काही शेतकरी प्रतिनिधी रिंगरोडमध्ये जास्तीचा मोबदल्याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत आक्राळस्थळाची भूमिका घेतात अनेक पक्षात जाऊन आले त्यांचे कोणाचेही पटले नाही. मात्र आमदारांना दोषी धरत मदत केली नाही पाठपुरावा केला नाही असा आरोप करत आहेत. रिंगरोड बारा गावातील शेतकर्‍यांना 12 टक्के वाढीव निधी देण्याबाबत शासन पातळीवर आमदारांचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी नमूद केले.

जशास तसे उत्तर देणार

आमदार दिलीप मोहिते पाटील हे सर्व शेतकरी आणि नागरिकांची बाजू घेत प्रश्‍न सोडवतात. विधानसभेत पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करतात. कोणताही विषय आला की विरोधक आमदार मोहिते यांच्यावर टीका टिपण्णी करतात. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करतात मात्र हे या पुढे आम्ही सहन करणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अरुण चांभारे यांनी दिला आहे.

“2015 पासून बारा गावातील जिव्हाळ्याचा रिंगरोडचा प्रश्‍न सुरू आहे. महसूल विभाग पालकमंत्री मंत्रालय पातळीवर आमदार मोहिते पाटील यांनी बैठका घेत पाठपुरावा केला आहे. अमोल पवार आणि पाटील गवारी यांनी मात्र दोन दिवसांच्या पत्रकार परिषदेत आमदारांवर रिंगरोडबाबत मदत झाली नाही म्हणून टीका केली.” – कैलास लिंभोरे, सभापती, बाजार समिती, खेड