पुणे जिल्हा : अपघातास कारणीभूत कमान हटविली

बारामती नगरपरिषदेला जाग : दोन मतप्रवाह चव्हाट्यावर
बारामती  – बारामतीतील रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने ये – जा करू नयेत, या उद्देशाने पालिकेने उभारलेला “रिस्ट्रिक्‍टर’ (लोखंडी कमान) वारंवार अपघात घडत असल्याने तसेच वाहतुकीची कोंडी होत असल्याने अखेर नगरपरिषद प्रशासनाने काढली. तरी देखील लोखंडी कमान गरजेची असल्याचा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे नगरपरिषद, वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना ये – जा करण्यास बंदी असतानाही अवजड वाहने जात आल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. अपघाताची शृंखला सुरूच आहे. वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

बारामती शहरातील उड्डाणपुलावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेक जण यात गंभीर जखमी तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी (दि.21) सकाळी सातव चौक ते भिगवण रस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर जडवाहतूक करणाऱ्या कंटेनरने लोखंडी कमान तोडली. यामुळे ही कमान दुचाकीवर पडल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. गेल्याच आठवड्यात उड्डाणपुलाच्या खाली एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात घडला होता. यात जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वाराचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बारामती बाह्यमार्गावरील सातव चौक ते भिगवण रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये म्हणून याठिकाणी लोखंडी कमान बसवण्यात आली. तीच या कंटेनरने पाडली. यामुळे लोखंडी रॉड तुटून दुचाकीचालकाला लागला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहतूक होऊ नये हे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी लोखंडी कमान बसविताना पुलाच्या दोन्ही बाजूला समान उंचीची बसवण्याची गरज आहे.

सातव चौक बाजूला जादा उंची तर भिगवण रस्ता बाजूला कमानीची उंची कमी झाल्यामुळे अपघात घडले आहेत. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी बारामती शहराच्या बाह्यमार्ग तयार करण्यात आला. नीरा, मोरगाव, पाटस, फलटण या रस्त्याला जाण्यासाठी जडवाहनांना या मार्गाचा वापर होतो. त्यामुळे तुलनेने गर्दी अधिक असते. पालिका प्रशासन, आरटीओ, पोलीस यांनी बारामती शहरातील अपघातांबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या बाह्यमार्गावरून सध्या उसाचे ट्रक- ट्रॅक्‍टर वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. यावरही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय लोखंडी कमान उभी करताना दोन्ही बाजूंनी ती समान उंचीवर असावी. पुढे “रिस्ट्रिक्‍टर’ असल्याने मोठी वाहने जाणार नाहीत, असे फलक आसने गरजेचे आहे.

सातव चौकातून कोंडी कारणीभूत
सातव चौक बाजूकडून उड्डाणपुलावरून कंपन्यांचे साहित्य ने-आण करणारी अवजड वाहने पुढे जातात. भिगवण रस्त्यालगत कमानीला ते अडकून पडतात. ही वाहने अडकली की मागे उड्डाणपूल असल्याने आणि लगत मोठमोठ्या अपार्टमेंट असल्याने त्यांना वळण घेता येत नाही. रिव्हर गिअरमध्ये अशी अवजड वाहने सातव चौकापर्यंत मागे न्यावी लागतात. या कालावधीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मोठी वाहतूक कोंडी होते.

अपघात व वाहतूक कोंडीमुळे यापूर्वी देखील उड्डाणपुलावरील लोखंडी कमान काढण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या मागणीनुसार पुन्हा कमान बसविण्यात आली. लोखंडी कमान असावी की नसावी असे दोन मतप्रवाह आहेत. नगरपरिषद प्रशासन वाहतूक पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून कमानीची उंची निश्‍चित केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे उड्डाणपुलाला काही धोका निर्माण होऊ शकतो का याचा देखील विचार होणार आहे.
– महेश रोकडे, मुख्याधिकारी नगरपरिषद, बारामती.