पुणे जिल्हा; ग्रामपंचायतीपेक्षा “शाळा’ भारी

शिक्रापुरातील ग्राम सदस्यांना शाळा समिती सदस्य पदाचे वेध

शेरखान शेख
शिक्रापूर  –निवडणूक काळामध्ये नागरिकांना वेगवेगळे अनुभव येत असतात. अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिक्रापूर हे गाव प्रत्येक निवडणुक काळात जिल्ह्यात चर्चिले जात आहे, मात्र आता येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीची पदे भारी वाटू लागली आहे. ग्रामपंचायत सदस्यांना शाळा समिती सदस्य पदाचे वेध लागल्याचे दिसून येत आहे.

शिक्रापूर हे पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे गाव. येथे कोणतीही निवडणूक शांततेत व बिनविरोध होत नाही. शिक्रापूर गावामध्ये वेगवेगळ्या चार ते पाच जिल्हा परिषद शाळा आहेत. मागील महिन्यामध्ये येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली. यावेळी एक ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उभा होता, मात्र यावेळी मतदान घेत झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्याचा पराभव झाला आणि ग्रामपंचायत सदस्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले.

सध्या गावातील शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अनेक ग्रामपंचायत पदाधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी शाळेमध्ये प्रवेश करीत निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला. दरम्यान उपसरपंच गटातील काही व्यक्‍तींनी एका पालकाच्या नावे अर्ज देत शाळेमध्ये विद्यार्थी असलेल्या पालकांना निवडीमध्ये घ्यावे. परंतु दत्तक पालक अथवा अस्थाई पालकांना निवडीमध्ये घेऊ नये असा अर्ज दाखल केला. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या.

परंतु सरपंच रमेश गडदे यांच्या पत्नीला शाळेत त्यांचा विद्यार्थी नसताना देखील त्या वर्गातून सर्वांच्या सहमतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी घेण्यात आले.त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच शिक्षण तज्ज्ञ संचालक पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये मतदान घेण्यात आले.

अध्यक्षपदासाठी तीन तर उपाध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार उभे होते परंतु शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश गायकवाड व उपाध्यक्षपदी मिलिंद शिंदे यांची मतदान प्रक्रियेत वर्णी लागली. परंतु शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ज्ञ सदस्य पदासाठी देखील मतदान घेण्यात आले. यावेळी एका माजी उपसरपंच तसेच तंटामुक्‍त समितीचे माजी अध्यक्ष यांनी सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी मतदान प्रक्रियेत माजी उपसरपंचांचा पराभव झाला. परंतु ग्रामपंचायत सदस्यापेक्षा शाळा समीतीच भारी असा नारा सध्या सदस्यांमधून होऊ लागला आहे.

दोघांच्या निवडीत शिक्षक गोंधळात
शाळा समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य नेमावा लागत असल्याने उपसरपंच रमेश थोरात यांनी एका सदस्याचे नाव सुचवत तसे पत्र शाळेकडे जमा केले. त्यावर ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांच्या सह्या आहेत. त्यानंतर सरपंच रमेश गडदे यांनी देखील पुन्हा शाळेकडे पत्र देत एका सदस्याचे नाव सुचवले. त्यावर फक्‍त सरपंच रमेश गडदे यांची सही आहे, मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने या पदासाठी वेगवेगळी दोन पत्र देत वेगवेगळी नावे देण्यात आल्याने शिक्षक देखील गोंधळात पडले आहेत.

शालेय व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत मधील सदस्यांना घेण्यात येणाऱ्या पदासाठी ग्रामपंचायत कडून दोन पत्र येत दोन वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत मात्र आम्ही ग्रामपंचायतला पुन्हा पत्र देत सदस्याचे नाव सुचवण्याची विनंती करणार आहे असे
– दिलीप कुसाळे, मुख्याध्यापक