पुणे जिल्हा : यशासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

उद्योजिका वर्षा काळे ; कोंढापुरीत विकासावर मार्गदर्शन
रांजणगाव गणपती –
जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन तर्डोबाचीवाडीच्या माजी आदर्श सरपंच व उद्योजिका वर्षा फक्कड राव काळे यांनी केले. कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये बिजनेस डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, मी स्वतः माझ्या व्यवसायाची गावात पहिली शाखा सुरु केली. पुढे कालांतराने सरदवाडी व शिरूर येथे शाखा सुरु करून उद्योग क्षेत्रात प्रगती करीत असतानाच रांजणगाव एम्आयडीसीमध्ये दोन कंपन्यांची स्थापना केली आहे. हे व्यवसाय करताना अडचणींना सामोरे जावे लागतो. त्यामध्ये संयम, चिकाटी, विश्वास ठेवावा लागतो, व्यवसायामधे भांडवल हे सुद्धा महत्वाचे असते.

कामगारांसोबत जर आपला संवाद चांगला असेल तर पुढचे काम सोपे व चांगल्या पद्धतीने होते, बिजनेस करताना शिस्त, व्यवस्थापन, उत्पादन व मालाची गुणवत्ता या गोष्टी मोलाच्या असतात. माझ्या यशामध्ये माझे आई, वडिल, सासू- सासरे व पतीचा संपूर्ण पाठींबा तसेच मार्गदर्शन मिळाले म्हणून आज एक यशस्वी उद्‌योजिका म्हणून समाजात ओळख आहे.

कार्यक्रमाचे आयोजन डाँ. चारुलत्ता कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी डाँ. योगेश भोवत, डाँ. सुनील उजागरे व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी सुरेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. डाँ. चारुलत्ता कुलकर्णी यांनी आभार मानले.