पुणे जिल्हा : ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; शेती पिके जळाली

मंचरच्या भेकेमळ्यातील स्थिती : शेतकरी हैराण
मंचर –
मंचर परिसरातील भेकेमळा येथे महावितरणचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून दुरुस्तीअभावी शेतीपिके जळाली आहे. अनेकवेळा महावितरणकडे ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करून देखील दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सरकारने अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून सक्तीची वसुली महावितरणने करू नये. मंचर परिसरात अतिशय कमी पाऊस पडला असल्यामुळे भेके मळ्यात असणाऱ्या धरणात थोड्याफार प्रमाणात पाणी आले असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक घेतले असून ते पाणी एक-दोन महिने टिकेल; परंतु तेथील ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे त्यांना शेतीला पाणी देता येत नाही.

संतोष भेके, दिनेश भेके, गणेश भेके, सुभाष निघोट, यशवंत थोरात, बाळशिराम थोरात, माताजी थोरात, केरभाऊ भेके आदी शेतकऱ्यांची शेती पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. महावितरणने नादुरस्त असलेला ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी चालू वीज बिल त्वरित भरावे, लगेच ट्रान्सफॉर्मर उपलब्ध केला जाईल.

-एस. बी. बाराहाते, सहायक अभियंता, महावितरण मंचर