पुणे जिल्हा : मुळशीची शक्‍तिदायिनी आई तुळजाभवानी

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मुळशी तालुक्‍यात औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिरंगुट गावच्या टेकडीवरील शिवकालीन तुळजाभवानी माता मंदिर हे वैभव बनले आहे. तमाम मुळशीकराचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी माता मंदिरात नवरात्र उत्सवाची रेलचेल सुरू आहे.

शिवकाळात गनिमांविरोधात लढताना भवानी मातेच्या परिसरात युद्ध झाल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. शिवरायांचे एकनिष्ठ सरदार बाजी पासलकर यांनी पिरंगुटच्या माळरानावरून पळवून लावले होते. शिवकाळात युद्ध जिंकल्यावर पवित्र रणभूमीत कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची प्राणप्रतिष्ठा केली जायची. त्यानुसार पिरंगुट येथील या टेकडीवर मावळ्यांनी तुळजा भवानी मातेचे मंदिर बांधले आहे. पिरंगुट परिसरातील लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मंदिरात देवीची मनोभावे पूजा करत असे. स्वातंत्र्यानंतर पवळे घराण्यातील देवभक्त स्वर्गीय गंगुबाई एकनाथ पवळे यांनी चैत्र पौर्णिमा घस्थापनेची परंपरा सुरू केली. हे करत असताना त्यांनी देवीबरोबर भाविकांची देखील मनोभावे सेवा केली.

तरूणांनी एकत्र येत केला परिसराचा कायापालट
गंगुबाई पवळे या स्वर्गवासी झाल्यावर परिसरातील भक्त मोठ्या स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा करत आहे. अशातच पिरंगुट मधील सेवाभावी तरुणांनी एकत्र येत जय तुळजा भवानी सेवाभावी ट्रस्टची स्थापना केली. या सेवाभावी तरूणांनी एकत्र येत ट्रस्टच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्ती, संस्था आदींच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट केला आहे.

मोफत पोलीस भरती प्रशिक्षण
जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून मुळशी तालुक्‍यातील मुलांना पोलीस उपनिरीक्षक संतोष भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पोलीस प्रशिक्षण दिले जात आहे. आजपर्यंत एकूण 35 तरुण तरुणी महाराष्ट्र राज्य पोलिस दलात आपले कर्तव्य बजावत आहे.

ट्रस्ट खालीलप्रमाणे
रामदास मुरलीधर पवळे, संस्थापक अध्यक्ष, सचिन हिरामण पवळे : अध्यक्ष, जगदीश रामचंद्र निकटे : उपाध्यक्ष, तुषार अण्णा कुंभार : सचिव, संदिप देवराम नवाळे : सचिव, विश्‍वस्त : उमेश चिंधु पवळे, संतोष राजाराम पवळे, दिपक प्रकाश कुदळे, विशाल चंद्रकांत धोत्रे, संदिप सुरेश सातव

प्रवीण सातव