पुणे जिल्हा : आंबेगावात युरियाची टंचाई ; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

– राजकीय नेते निवडणुकीत मश्गुल
मंचर –
आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात शेती पिकासाठी लागणाऱ्या युरिया या खताच्या तुटवडा जाणवत असून शेतकरी खत औषधाच्या दुकानात युरिया घेण्यासाठी जात आहेत. मात्र, युरियाच्या गोणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मोकळ्या हाती परत येत आहेत. राजकीय नेते निवडणुकीत मश्गुल असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

आंबेगाव तालुक्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने येथील शेतकरी बाराही महिने विविध पिके घेत असतात तसेच तालुक्यात घोड नदीचे पाणी, हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण उजव्या कालव्याचे पाणी उपलब्ध होत असल्याने येथील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतो. सध्या अनेक शेतकऱ्यांची कांदा, बटाटा पीक काढणी झाली असून शेतात ऊस लागवड करण्याची लगबग सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी उन्हाळी भुईमूग, उन्हाळी बाजरी फुलोऱ्यात आली आहे.

शेती पिकांच्या वाढीसाठी असलेल्या युरिया खताला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसापासून आंबेगाव तालुक्यातील खाजगी दुकानात तसेच खत औषधे दुकानात युरिया खताचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांना अनेकदा युरिया उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम शेती पिकांवर होत आहे. उसाची लागवड तसेच अनेक तरकारी पिके, भाजी पाला या पिकांच्या वाढीसाठी युरीया खत महत्त्वाचे असते. मात्र, अनेक दुकानदारांकडून युरिया खतासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

युरियाची गोण घेताना त्याबरोबर इतर खताची गुण घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. दरम्यान या सर्व प्रकाराकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. गावागावात निवडणुकीचे वारे वाहत असून गाव पुढाऱ्यासह नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

जादा रक्कम आकारणी…
दरम्यान पंचायत समिती कृषी विभाग आणि शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे ही दुर्लक्ष असल्याने युरियाची मोठी टंचाई होत असताना आणि युरिया गोणी बरोबर इतर खताच्या गोणी घेण्यासाठी दुकानदारांकडून जबरदस्ती केली जात असतानाही शासकीय अधिकारी मूग गिळून बसले असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.