पुणे जिल्हा : उरुळीच्या शेतकऱ्याची सावकाराच्या तावडीतून सुटका

सहा वर्षांपूर्वीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

उरुळी कांचन – उरुळी कांचन येथील शेतकऱ्याने पाट्स (ता. दौंड) येथील शेतजमीन खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपये मासिक 5 टक्के व्याजदराने उडवंडी (ता. दौंड) येथील एका खासगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याने दिलेले धनादेश बँकेत भरले. हे धनादेश न वटल्यामुळे सावकाराने फिर्याद देत दौंड न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. याबाबत मागील 6 वर्षांपासून हा खटला सुरु होता. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शेतकऱ्याची निर्दोष सुटका करीत दिलासा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील शेतकरी विकास अमृत तुपे यांनी दि. 25 फेब्रुवारी 2016 मध्ये पाटस येथील शेत जमिनीची 50 गुंठे खरेदी करण्यासाठी उंडवडी येथील सावकार भिकू जयसिंग कांबळे याच्याकडून 15 लाख रुपये मासिक 5 टक्के व्याजदराने घेतले होते. त्या रकमेच्या परतफेडीपोटी व हमीपोटी शेतकरी तुपे यांनी सावकाराला जमिनीची विसार पावती लिहून दिली होती. त्यांचे व वडिलांचे मिळून 11 कोरे धनादेश दिले होते.

शेतकऱ्याने शेतजमीन ज्ञानेश्वर आखाडे व चौंडकर यांना खरेदी दिली. ही बाब फिर्यादी यांना समजल्यानंतर व्यवहाराच्या तडजोड पोटी 18 लाख 50 हजार रुपये देण्याचे मान्य केले. आरोपी तुपे यांनी फिर्यादी कांबळे यांना सर्व रक्कम व्याजासह परत दिली असताना देखील फिर्यादी कांबळे यांनी आरोपी तुपे यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.

कांबळे यांनी तुपेकडून घेतलेले धनादेश बँकेत वटण्यासाठी भरले. मात्र हे धनादेश वटले नाहीत. म्हणून फिर्यादी कांबळे यांनी शेतकऱ्याविरुध्द दौंड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी खटला दाखला केला. मात्र, न्यायालयीन कामकाजात आरोपी शेतकरी तुपे यांच्याविरुध्द दाखल केलेल्या केसमध्ये कोणतेही सबळ पुरावे सिध्द झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपी शेतकरी तुपे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, खटल्यामध्ये शेतकरी तुपे यांच्या वतीने अ‍ॅड. तानाजी ज्ञानोबा इंदलकर यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. ऋग्वेद इंदलकर व अ‍ॅड. शुभम खोमणे यांनी सहकार्य केले.