पुणे जिल्हा : राजगुरूनगरात नवमतदारांना मतदानाची शपथ

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जनजागृती रॅली
राजगुरूनगर –
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ व हुतात्मा राजगुरू महाविद्यालय साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजगुरुनगर शहरामध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करत राष्ट्रीय मतदार दिवस गुरुवारी (दि. 25) साजरा करण्यात आला. यावेळी नवमतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.

याप्रसंगी मतदार नोंदणी अधिकारी तथा खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे, गटशिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी अमोल जंगले, प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार राम बीजे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे,

साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य एच. एम. जरे, निवडणूक विभागातील महेश खंडागळे यांच्यासह निवडणूक शाखा कर्मचारी वर्ग, पर्यवेक्षक व स्थानिक बीएलओ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट निवडणूक कामकाज करणार्‍या कर्मचारी तसेच मतदार जनजागृतीमध्ये विशेष सहभाग नोंदविणार्‍या महाविद्यालयांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.