पुणे जिल्हा : नियोजनाअभावी राज्यात पाणीटंचाई – खासदार सुळे

इंदापूर  – सध्या राज्यात 37 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही. मागील वर्षी डिसेंबर पासून मी शासनाला पाणी नियोजनाबद्दल सांगत होते; मात्र त्यांनी त्यावेळी लक्ष दिले नाही. आज उजनी धरणात देखील उणे चाळीस टक्के पाणी आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतीसाठी, जनावरांसाठी व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

इंदापूर येथे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी भरत शहा व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी मुकुंद शहा, प्रशांत बापट, अमोल भिसे, चितरंजन पाटील, शकील सय्यद, सागर मिसाळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, गणेश महाजन, बापू जामदार, असिफ बागवान, पोपट पवार, प्रशांत उंबरे, गौरव राऊत, अशोक चव्हाण, शुभम पवार, अर्शद सय्यद, असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शहा म्हणाले की, आज आपल्यासोबत केवळ चार नगरसेवक आहेत. बाकी सर्व सत्ताधारी पक्षाकडून आहेत. मागील दहा वर्षात सर्व शासकीय योजना आपण राबविल्या हे घराघरात जावून सांगणार आहोत. कोणी काहीही सांगतील, मात्र ग्राऊंडवर आपण काम केले आहे. सर्व निधी हा शासकीय होता. हे सर्वांना समजून सांगितले पाहिजेत.

 इंदापूर शहराला भविष्यात मदत करणार
संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण देखील बुथवरील सर्व कार्यकर्ते यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहोत. भरत शहा यांचे प्रचंड नेटवर्क आहे. त्याचा फायदा पक्षाला होणार आहे. युवकांचे प्रश्न असतील, शहरवासियांचे असतील. त्यासाठी इंदापूर शहराला भविष्यात मदत करणार आहोत. अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली.

इंदापूर शहरात मागील दहा वर्षे आम्ही सक्रियपणे नागरिकांसाठी काम करतोय. त्यामुळे तळागाळातील चांगल्या लोकांशी आमचा चांगला संपर्क आहे. येणार्‍या काळात देखील इंदापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, जनतेच्या मनातील खासदार निवडून देण्यासाठी, आम्ही घर टू घर प्रचार करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी राहू.
-भरत शहा, माजी उपनगराध्यक्ष इंदापूर