पुणे जिल्हा : निर्ढावलेल्या पिढीवर अंकुश कोणाचा?

भौतिक सुविधांच्या चक्रात पालकांचा काणाडोळा
तेजस फडके
निमोणे –
सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवले. दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. शिरुर तालुक्यातील अरूणगावात पोर्शे पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली आहे.

एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिली. ही घटना समजताच संपूर्ण शिरूर तालुक्यासह जिल्हा सुन्न झाला आहे. भौतिक सुविधांच्या चक्रात पालकांचा काणाडोळा होत असून निर्ढावलेल्या पिढीवर अंकुश कोणाचा?, असा प्रश्‍न सूज्ञ पालकांना पडला आहे.

दौंड तालुक्यातील हा तीस वर्षीय तरुण रोहित्राचे ऑईल आणण्यासाठी न्हावरे येथे येताताना त्याच्यावर काळाने दुर्दैवी घाला घातला. त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. पुण्यातील प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या वडिलांनी अतोनात प्रयत्न केले. ही घटना ताजी असताना शिरूर तालुक्यातील घटना समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा पिता मुलीला वाचविण्यासाठी विविध युक्त्या करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिरूर तालुका हा गेल्या २३ वर्षांत सधन, आर्थिक संपन्नतेच्या वाटेवर आला आहे. तालुक्याचा निम्मा भाग हा दुष्काळी असताना त्याला औद्योगिकीकरण, नागरिकीकरणामुळे चालना मिळाली आहे. गुंठा मंत्र्यांनी श्रीमंतीच्या दारात मांडव टाकला आहे. सर्व भौतिक सुविधांच्या मागे धावणारे समाज आणि राजकीय क्षेत्रातील वावर हा धुंदीला बळकटी देत आहे. त्यातून भावी पिढीवर संस्कार नामक मात्रा लागू होत नाही. अनेक कुटुंबातील मुले पालकांच्या दुर्लक्षामुळे वाहत गेली आहेत. त्यांना प्रतिकूल परिस्थितीची जाणीव, संवेदना नसल्यामुळे लाडात वाढलेली मुले बिघडत आहेत. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यानंतर ही बेदरकार पिढी कानात वारे शिरल्याप्रमाणे चौखूर उधळली आहे. यावर पालकांचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.

पोरीला वाचविण्यासाठी बापाची धडपड
अरणगाव येथील अपघातात पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीमुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र महिंद्र बांडे जखमी झाला. परंतु आपल्या मुलीवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस पाटील असलेल्या बापाने थेट शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत मीच पिकअप चालवत होतो, असा कांगावा केला. परंतु अपघातातील जखमीने अल्पवयीन मुलगीच गाडी चालवत असल्याचे सांगितल्याने पोरीला वाचविण्यासाठी चाललेली बापाची धडपड व्यर्थ ठरली. बाप- लेकीवर गुन्हा दाखल झाला.

दौंडच्या मेमाणे कुटुंबावर शोककळा
दौंड तालुक्यातील वडगावबांडे या गावात मयत अरुण विठ्ठल मेमाणे (वय 30) हा त्याचे वडील विठ्ठल मेमाणे, आई संगिता मेमाणे, पत्नी अश्विनी मेमाणे, मुलगा आविष्कार, मुलगी अनुष्का, आज्जी मुकाबाई आणि भाऊ सतीश मेमाणे यांच्या सहीत एकत्र कुटुंबात राहत होता. अरुण हा शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रोहित्राचे ऑईल लिक होऊन संपले असल्याने ते आणण्यासाठी अरुण मेमाणे व महिंद्र बांडे हे न्हावरे येथे चालले होते. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात झाल्याने दौंड तालुक्यात सुन्न झाला आहे.

पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका
शिरुर तालुक्यात अनेक अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, मालवाहतुकीच्या गाड्या सर्रास दिसतात. अनेक पालक हौसेने स्वतःच्या मुलांना गाडी चालवायला देतात. कॉलेजचे युवक शिरुर शहरात बेदकारपणे गाड्या चालविताना दिसतात. ग्रामीण भागात ही मुले बेशिस्तपणे वाहने पळवत असताना शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरुर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

दैनिक प्रभातने वर्तविली होती शक्यता
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी गाड्या आहेत. त्यामुळे पुण्यासारखीच दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यात घडू शकते, यांचा अंदाज ‘दैनिक प्रभात’ ने आधीच वर्तवला होता. त्यानंतर काही दिवसांतच अरणगाव येथे अल्पवयीन मुलीच्या हातात मालवाहू पिकअप चालविण्यास दिल्याने एक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर तालुक्यात भविष्यात अजून अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी यावर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिरुर तहसील आणि पोलिसही निद्रिस्त
शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथे सध्या घोड धरणातून बेकायदेशीररीत्या मोठया प्रमाणात शेतीसाठी काळी माती उपसण्याचा सपाटा काही स्थानिक मातीचोरांनी लावला आहे. माती वाहणाऱ्या ट्रॅक्टरवर अल्पवयीन वाहनचालक आहेत. अनेक ट्रॅक्टर व वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. याबाबत आवाज उठवला आहे. परंतु शिरुरचे महसूल आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई करण्याचे सोडून मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे हा गंभीर अपघात त्याचीच साक्ष देणारी आहे.