पुणे जिल्हा : पालखी महामार्गाचे काम संथ गतीने

भवानीनगरात छत्रपती कारखान्यासमोर काम बंद अवस्थेत
भवानीनगर –
श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर अतिशय संथ गतीने चालू असून गेले वर्षापासून हे काम बंद अवस्थेत आहे. हे काम येणार्‍या सहा ते सात महिन्यात पूर्ण व्हावे अन्यथा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होणार असल्याची चर्चा परिसरात आहे.

लिमटेक ते सणसर या ठिकाणापर्यंतचे काम रखडले असून हे काम युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे असून या रस्त्यावरती उडणार्‍या धुळीचा त्रास अजून किती दिवस सहन करायचा असा सवाल नागरिक करत आहेत. या खराब रस्त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे अनेक अपघातही होत आहेत.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे गाळप हंगाम संपला आहे; परंतु येणार्‍या सहा महिन्यानंतर गाळप सुरू होण्याअगोदर या भागातील रस्ता तयार होणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांना या रस्त्यामुळे सध्या होणार्‍या त्रासापेक्षा अधिक त्रास सहन करावा लागणार हे मात्र नक्की!